Thursday, 12 Dec 2019

दादासाहेब लाड यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीची मागणी.

कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदार संघाची निवडणूक जुलै 2020 मध्ये होत आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा ,सोलापूर व पुणे असे पाच जिल्हे या मतदारसंघात येतात. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक आमदार झाला पाहिजे असा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक बांधवांनी केलेला आहे . या पार्श्वभूमीवर कोजिमाशि पतसंस्थेचे सर्वेसर्वा शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनाच शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी दादा प्रेमी असंख्य शिक्षक कार्यकर्त्यांनी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयांमध्ये भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. याप्रसंगी गजानन चव्हाण, हरीश गायकवाड, एस .टी.चौगुले ,राजेंद्र माने, संजय ओमासे ,संभाजीराव खोचरे, रवींद्र मोरे,कोजिमाशि चेअरमन राजेंद रानमाळे, भरत रसाळे आदी मान्यवरांची भाषणे झाली. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी बोलताना पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सुमारे 45000 मतदार नोंदणी झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातून यावेळी 10800 इतकी मतदार नोंदणी झाली आहे .पुढील टप्प्यात उर्वरित मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे .अशी माहिती आपल्या भाषणातून दिली .आमदार सतेज पाटील सहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना एकत्र आणून एकच उमेदवार सर्वसंमतीने द्यावा व कोल्हापूर जिल्ह्याचा शिक्षक आमदार करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी दादासाहेब लाड यांनी केली. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ,कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन सर्वसंमतीने जिंकण्याची क्षमता असणारा उमेदवार देण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन .पाच जिल्ह्यांमध्ये पोहोचू शकेल असाच उमेदवार जिंकू शकेल. सर्व इच्छुक उमेदवार व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते यांना मी एकत्र बोलावून लवकरच सर्वसंमतीने एकच उमेदवार देण्याचा माझा प्रयत्न राहील. तुम्ही सर्व सुज्ञ शिक्षक मतदारांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. यावेळी दादासाहेब लाड यांना मानणारे शिक्षकांच्या पतसंस्थांचे संचालक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी असे सुमारे अडीचशेहून अधिक शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचालन एस. पी. पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *