Saturday, 23 Nov 2019

एल अँड टी सारख्या संस्थांच्या मदतीतून महापुराच्या संकटातून बाहेर- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी एल अँड टी संस्थेने दिलेली मदत योग्य ठिकाणी पोहचली याची प्रचिती निश्चितच येईल. महापुराच्या काळात कोल्हापूरकरांनी दाखविलेले धैर्य, सहकार्य आणि एल अँड टी सारख्या विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून महापुराच्या संकटातून बाहेर पडता आले. याचे सर्व श्रेय कोल्हापूरकरांना आणि दातृत्वाला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
महापुराच्या काळात जिल्ह्यातील बाधित झालेल्या अंगणवाड्यांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. एल अँड टी कंपनीच्यावतीने आज अंगणवाड्यांमध्ये लागणाऱ्या सर्व साहित्यांची मदत करण्यात आली असून या साहित्याचे प्रायोगिक वाटप आज करण्यात आले. यावेळी एल अँड डी कंपनीचे सचिव प्रमोद निगुडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सुषमा देसाई, महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, महापुरामध्ये सुमारे 1 लाख कुटुंबं बाधित झाली. 159 कोटी रुपयांचं अनुदान वाटण्यात आले आहे. अजुनही अनुदानाचे वाटप सुरु आहे. शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येणार आहे. महापुरासारख्या मोठ्या संघटातून सहिसलामत बाहेर पडण्याचं सर्व यश कोल्हापूरकरांना जाते. कठीण परिस्थितीत जो-तो मिळेल त्या साधनाने पुरग्रस्तांची मदत करत होता. आज पुरबाधित गावात गेल्यानंतर पूर येवून गेला असे वाटत नाही. याचे सर्व श्रेय कोल्हापूरकरांच्या सहकार्याला विविध सामाजिक संस्थांच्या दातृत्वाला जाते. एल अँड टी ने योग्य ठिकाणी चांगली मदत केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
एल अँड टी चे सचिव श्री.निगुडकर यावेळी म्हणाले, महापुरासारख्या कठीण परिस्थितीला तुम्ही सर्वांनी ज्या पध्दतीने तोंड दिले त्याला माझा सलाम. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनात चांगले प्रमुख असतील तर काय होवू शकते हे कोल्हापूर जिल्ह्याने दाखवून दिले आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणांनी चांगल्या पध्दतीने काम केले आहे. या सगळ्याचा दस्तावेज करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
श्री. रसाळ यांनी प्रस्ताविक करुन अंगणवाडीमधील नुकसान झालेल्या साहित्याचे त्यांनी माहिती दिली. 20 लाख 52 हजार रुपयांचे नवीन साहित्य एल अँड टी कंपनीने जिल्ह्यातील 294 अंगणवाड्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चिखली, अंबेवाडी, शिंगणापूर येथील अंगणवाडी सेविकांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. महापुर काळातील आपले अनुभव अंबेवाडीतील अंगणवाडी सेविका पुनम चौगुले यांनी यावेळी सांगितले. बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी सुरुवातील स्वागत करुन सूत्रसंचालन केले. तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नयना इंगवले यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *