Friday, 22 Nov 2019

करवीरमध्ये आजी-माजी आमदारांऐवजी वंचितच्या डॉ. आनंद गुरव यांना मतदारांची वाढती पसंती?

करवीर विधानसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत असून दिवसेंदिवस चुरस वाढू लागली आहे. करवीर विधानसभा मतदार संघात दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. आनंद गुरव यांनी चांगलेच आव्हान निर्माण केल्याने सुरवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणुक आता तिरंगी झाली आहे.
करवीर विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार चंद्रदीप नरके रिंगणात उतरले आहेत. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून माजी आमदार. पी.एन.पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. या दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला असता दोघांचेही काम समाधानकारक नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे या दोघांना बाजूला सारून ‘बदल हवा’ म्हणून बरेचजण वंचितचे उमेदवार डॉ. आनंद गुरव यांना निवडून देण्यासाठी झटू लागले आहेत.
वंचित कडून निवडणूक लढवणारे डॉ. आनंद गुरव हे मुळचे गगनबावडा तालुक्यातील असून त्यांनी आपली डॉक्टरकी सर्वसामान्य, गोरगरीब लोकांसाठी रासाई हॉस्पीटलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. यामाध्यमातून त्यांनी करवीर मतदारसंघात आपल्या हक्काचा मतदार निर्माण केला असून त्याच जोरावर ते या निवडणूकीत उतरले असून सर्वच थरातून त्यांच्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ही त्यांची जमेची बाजू असून ते आजी माजी आमदारांना त्यामुळेच शह देत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे करवीर विधानसभा मतदार संघातील निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *