Saturday, 23 Nov 2019

कसे बनणार सरकार?; माघार घेण्यास कुणीही नाही तयार!

मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर ११ दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा पेच आजही कायम आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये निर्माण झालेला दुरावा जराही कमी झालेला नाही, तसेच तो दूर होतानाही दिसत नाही. आपल्याला आतापर्यंत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे म्हणत भारतीय जनता पक्षाने चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवण्याचे काम केले. तर, आम्ही मुख्यमंत्रिपद आणि इतर मंत्रालयांचे वाटपाबाबतचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला पूर्वीच दिला असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. राज्याच्या मागील विधानसभेचा कार्यकाल ९ नोव्हेंबर या दिवशी समाप्त होत आहे.

राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला असून, लवकरत महायुतीचे सरकार स्थापन होईल असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर म्हटले होते. सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेने कोणताही प्रस्ताल दिला नसल्याचे पाटील यांनीही तेव्हा म्हटले आहे. शिवेसेना लवकरच आम्हाला प्रस्ताव देईल आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे २४ तास उघडे असल्याचे पाटील म्हणाले. भारतीय जनता पक्ष सर्वांना सोबत घेऊनच सरकार स्थापन करेल असेही पाटील म्हणाले.

चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. आम्ही चर्चेला कधीही नाही म्हटलेले नसून चर्चेचे दरवाजे शिवसेनेने बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

मात्र, चर्चेत मुख्यमंत्रीपदावर अजिबात चर्चा होणार नाही, असे राज्याच्या एका मंत्र्याने स्पष्ट केले आहे. राज्यात सरकार हे भारतीय जनता पक्षाचेच बनेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील, असेही मंत्री म्हणाला.

शिवसेनेचे प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. जो पर्यंत भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास तयार होत नाही, तो पर्यंत भारतीय जनता पक्षाशी कोणतीही चर्चा होणार नाही, असे राऊत यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

*’शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकते’*

सरकार स्थापनेचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला असून भारतीय जनता पक्षाकडे अनेक पर्याय असल्याचे एका मंत्र्याने सांगितले. शिवसेनेच्या समर्थनाशिवायही भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करण्यास सक्षम आहे, असेही मंत्री ठामपणे म्हणाला.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने सरकार स्थापन करेल हे शक्य नसल्याचे मंत्री म्हणाला. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने जरी सरकार बनवले, तरी देखील ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत. याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष या सरकारला पाठिंबा देणार नाही, असेही मंत्र्याचे म्हणणे आहे.

राज्यातील भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी ठामपणे उभा असून केंद्रातील हायकमांडने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्याला हिरवा झेंडा दाखवला असल्याचे, चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे. फडणवीस यांची एकमताने नेतेपदी निवड झाली असून पूर्ण ताकदीने पक्ष त्यांच्या बाजूने उभा असल्याचे पाटील म्हणाले.

आम्ही अनेकदा आमचे मत स्पष्टपणे मांडले असून भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला पाहिजे. राज्यातील सरकार शिवसेनेच्याच नेतृत्वात बनायला हवे, असे संजय राऊत यांनी ठामपणे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली असून आता मुख्यमंत्रिपदासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेनेला धोका देत आहे, असे थोरात म्हणाले. भारतीय जनता पक्षाला केवळ शिवसेनाच नाही, तर सर्वच विरोदी पक्षांना नेस्तनाबूत करायचे होते. मात्र फडणवीस यांची ही योजना सफल होऊ शकली नाही, असेही थोरात म्हणाले.

काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नसल्याचेही थोरात म्हणाले. आम्ही एकजूट असून सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आमचे आमदार फोडू शकणार नाही, असेही थोरात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *