Friday, 22 Nov 2019

सक्षमच्या अधिवेशनाला कोल्हापूरात प्रतिसाद : तीन सत्रात चर्चासत्र विकलांगांसाठी काम करणाऱ्या सक्षम संस्थेसाठी योगदान द्या : डॉ. कसबेकर

कोल्हापूर : सर्व प्रकारच्या विकलांगांमध्ये काम करणारी सक्षम ही जगातील एकमेवे संस्था आहे. या संस्थेसाठी सामाजिक क्षेत्रासह वैद्यकीय चिकित्सक, उपचार चिकित्सक यासारख्या विविध घटकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन सक्षम संस्थेचे संरक्षक आणि माजी संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कसबेकर यांनी रविवारी येथे केले.

समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कसबेकर बोलत होते. येथील विश्वपंढरी सभागृहात झालेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक भगतराम छाबडा यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध प्रकारातील २२५ विकलांगांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कसबेकर म्हणाले, रोजगार, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रात सक्षमचे काम सुरु आहे. दृष्टिबाधित, श्रवणबाधित, अस्थिबाधित, बुध्दिबाधित, कुष्ठमुक्त विकलांग, रक्तबाधित या प्रकोष्ठांच्या माध्यमातून विविध विकलांगांचे प्रश्न सोडविते तसेच त्यांच्यातील क्षमतांचा विकास घडविण्यासाठी सक्षम प्रयत्न करते. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सक्षमच्या कार्यकर्त्यांनी मोठी झेप घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिवेशनाचे उद्घाटक जिल्हा संघचालक भगतराम छाबडा यांनी सक्षमच्या कामाचे कौतुक करताना समाजामध्ये विकलांगांच्या सन्मानासाठी व त्यांना सामान्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सक्षमने मोठे काम केले असल्याचे सांगितले.

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात डॉ. कसबेकर यांनी सक्षमची वाटचाल या सत्रात बोलताना देशभरात चाललेल्या उपक्रमांची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात दिव्यांग व्यक्तींचे अधिकार व कायदे या विषयावर अ‍ॅड. अमोघ भागवत यांनी नव्या कायद्यामध्ये दिव्यांगांना कोणकोणते अधिकार दिले आहेत, याची माहिती दिली. १९९५ मध्ये झालेल्या पहिल्या विकलांग कायद्यानंतर २0१६ पर्यंत झालेल्या कायद्यातील बदल, तरतूदी आणि अधिकार यावरही त्यांनी माहिती दिली. पालकत्व, शिक्षण, नोकरी, विविध शासकीय सुविधा, सोयी तसेच समस्यांविषयी सविस्तर माहिती दिली.

तिसऱ्या सत्रात घरौंदा वसतिगृहाचे तानाजी देसाई यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या सर्र्वागिण पुनर्वसन योजना, समस्या आणि उपाय याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित अनेक दिव्यांगांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

प्रारंभी डॉ. मिलिंद कसबेकर आणि भगतराम छाबडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सक्षमचे अध्यक्ष गिरिश करडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. शुभांगी खारकांडे यांनी सूत्रसंचालन केले तर सारिका करडे यांनी आभार मानले.

भक्ती करकरे यांनी गायिलेल्या पसायदानाने अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनासाठी डॉ. चेतन खारकांंडे, दीपाली पालकर, अजय वणकुद्रे, वसंत सुतार, मनिषा माने, विनोद पालेशा, तुषार डोंगरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *