Thursday, 12 Dec 2019

सत्ता स्थापनेत संभ्रम वाढला, महाशिवआघाडीने राज्यपालांची भेट पुढे ढकलली

मुंबई: राज्यात एका बाजूला सत्तासंघर्ष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला ओल्या दुष्काळामुळे बळीराजा संकटात आहे. याच पार्श्वभूमिवर आज महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार होते. पण आता ही भेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काँग्रेसच्या विनंतीनंतर ही वेळ पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. वेळ अचानक पुढे का ढकलण्यात आली याबद्दल अद्याप नेमकं कारण समोर आलेलं नाही. पण महाशिवआघाडीत काही बिनसलं का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शनिवारी दुपारी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे प्रशासकिय यंत्रणेचं कामकाज जवळपास बंदच आहे. त्यातच राज्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

राज्यात जवळपास सर्वच भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. मावळत्या सरकारने मदत देण्याचं जाहीर केलं असलं तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. उभ्या पिकाचं नुकसान झाल्यामुळं आता दररोजचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यांना लवकरात-लवकर मदत मिळावी यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तीन आठवड्यांचा कालावधी उलटला तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. एकत्र निवडणूक लढवणाऱ्या भाजप-सेनेमध्ये निकालानंतर मात्र मुख्यमंत्रिपदावरून मतभेद निर्माण झाले. त्यानंतर शिवसेनेसोबत सरकार स्थापण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार हालचाली सुरू आहेत. यावर रविवारी अंतिम निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेचा निर्णय होईल. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी म्हटलं की, फक्त काँग्रेस काही ठरवू शकत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाल्यानंतर पुढची वाटचाल ठरेल.

दरम्यान, गुरुवारी राज्यातील तीन पक्षाची एकत्र बैठक झाली. यामध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. त्यानंतर आता तीन पक्षातील वरिष्ठ नेते एकत्र मिळून चर्चा करतील. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत असं म्हटलं होतं. तसेच महाशिवआघाडीचं सरकार येईल आणि ते 5 वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल असं ही मह्टलं होतं.

मंत्रिपदाबाबत शिवसेनेनं 16- 14- 12 च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच 14-14-14 अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं समजत आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षांसाठी असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *